काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने भारताबरोबर युद्ध करण्याची भाषा करत असताना परराष्ट्रमंत्री शाह महमंद कुरेशी यांनी मात्र काश्मीर प्रश्नावर युद्ध हा पर्याय नसल्याचे सांगितले असून, भारताशी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. ‘बीबीसी उर्दू’ या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आण्विक युद्ध होऊ शकते, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी केली होती.
कुरेशी म्हणाले, ‘पाकिस्तानने कधीही आक्रमक धोरण अंगिकारलेले नाही. नेहमी शांततेला प्राधान्य दिले आहे. पाकिस्तान सरकारने भारताशी चर्चा करण्यास वेळोवेळी तयार दर्शविली आहे. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देश कोणत्याही स्थितीत युद्धाची जोखीम पत्करू शकत नाही,’ असेही त्यांनी सांगितले; परंतु ‘काश्मीर केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विपक्षीय मुद्दा नसून तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्दा आहे,’ असा आडमुठा सूर त्यांनी पुन्हा एकदा लावला.
WhatsApp us