छोटय़ा कुत्र्यासह सुमारे पन्नास लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलवले.
कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्यासह कोल्हापूरमधील अनेक नागरिक करत आहेत. येथील एका महिलेचे आगळे वेगळे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ समोर आले आहे. त्या महिलेने तब्बल पन्नास जणांचे प्राण वाचवले आहेत. डॉ. नंदिता परांजपे असे त्या रणरागिणीचे नाव आहे.
कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यावर डॉ. नंदिता परांजपे या धाडसी महिलेने आगळे वेगळे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करून सुमारे पन्नास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. ‘आयर्न मॅन’ या साहसी स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या डॉ. परांजपे कोल्हापूर येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नंदिता परांजपे-जोशी, त्यांचे पती डॉ. मधुर जोशी आणि चार वर्षांची मुलगी नभा कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरात राहतात.
पंचगंगेचे पाणी सोमवारी रात्री शहरात भरण्यास सुरुवात झाली. त्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. मित्राच्या घरी जायचे म्हणून नंदिता आणि कुटुंबीयांनी तयारी केली. मदतीसाठी राज आणि आकाश कोरगावकर यांचा संघ सर्वप्रथम पोहोचला, मात्र अडकलेले नागरिक आणि मदतीचे स्रोत यांचे प्रमाण व्यस्त असल्याने आपण देखील मदतीला हातभार लावावा, असा निर्णय डॉ. नंदिता यांनी घेतला. चार वर्षांच्या नभाला ‘बाथ टब’मध्ये बसवून, त्यासह पोहत पोहत त्यांनी तिला सुरक्षित ठिकाणी नेले.
दरम्यान, आसपास सुमारे चारशे नागरिक अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. सात ते आठ फेऱ्या पूर्ण करत आपल्या छोटय़ा कुत्र्यासह सुमारे पन्नास लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलवले. त्यासाठी प्लायवूडचे तुकडे, कॅन जोडून तयार केलेल्या तराफ्यांचा वापर त्यांनी केला. डॉ. नंदिता म्हणाल्या, साहसी खेळांची आवड असल्याने कोल्हापूर येथे ‘आयर्न मॅन’ या स्पर्धेचे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे पोहणे, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग या गोष्टी माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे पाण्यात उतरून रेस्क्यूमध्ये सहभाग घेण्याची भीती वाटली नाही.
अनेक स्थानिक नागरिक, अग्निशामक दल आणि इतर यंत्रणाही सर्व तयारीनिशी मदतीसाठी दाखल झाले होते, मात्र पुराचा आवाका, अडकेलेले नागरिक यांचे प्रमाण गंभीर होते. त्यामुळे आपण देखील शक्य तेवढय़ा लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे वाटले, त्यातून हे काम केले. प्रशिक्षक शुभम बुवा याने या कामात मोलाचे सहकार्य केले.
WhatsApp us