श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास दोन डझन दहशतवादी आढळून आले असून, त्यांच्याकडून मोकाटपणे दुकानदारांना धमकी देण्यात येत आहे. सुरक्षा दलापुढे ही चिंतेची बाब आहे. दहशतवादी या परिस्थितीचा उपयोग नागरिकांना भडकावण्यासाठी करणार नाहीत, यासाठी सुरक्षा दलाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे,’ असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
‘जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून पाच ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणीची घोषणा केली. तेव्हापासून राज्यात सरकारकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. परंतु, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अद्याप बिकट आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले असून, त्यांच्याकडून मोकाटपणे दुकानदारांना धमकी देण्यात येत आहे. दुकाने बंद ठेवण्यास आणि आदेश पाळण्यास सांगण्यात येत आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी दहशतवादी आढळल्याची शक्यता नाकारली नाही. मात्र ते मोकाटपणे फिरत आहेत, ही अतिशयोक्ती आहे, असे म्हटले आहे. तर, ‘सरकारने पाच ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्याची घोषणा केल्यापासून आजपर्यंत दहशतवादविरोधी अभियान प्रभावित झाले आहे. पाच ऑगस्टनंतर २० ऑगस्ट रोजी बारामुल्ला येथे आणि ९ सप्टेंबरला सोपोरमध्ये अभियान राबविण्यात आले,’ असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
