रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुडगूस सुरू असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली मार्गही बंद करण्यात आला असून खेडच्या बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.
खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि साताऱ्या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जगबुडीची पाणी पातळी ६.५० मीटर असून इशारा पातळी ६.०० मीटर एवढी आहे. जगबुडी नदीने आज सकाळी ९.३० वाजता ७.१० मीटरची पातळी गाठून इशारा पातळीही ओलांडल्याने खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्ग आणि दापोली मार्गही बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खेड बाजारपेठेतही पाणी शिरल्याने बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.