वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत असलेले भांडुप पोलिस ठाणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसोबत वाढदिवस साजरा करणे पोलिसांच्या अंगलट आले आहे. पोलिस ठाण्यात वाढदिवसाची पार्टी केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यातील पाच पोलिसांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सोनापूर येथील रहिवासी असलेल्या आयान खान उर्फ उल्ला या गुंडाचा वाढदिवस पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आला. अधिकाऱ्यांना केक भरवताना, गळाभेट देत शुभेच्छा देतानाचे व्हिडीओ, फोटो उल्लानेच व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवले. पुढे तेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी विभागीय चौकशी केली. या चौकशीमध्ये पाच पोलिसांवर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये उपनिरीक्षक सचिन कोकरे आणि पंकज शेवाळे तर हेड कॉन्स्टेबल सुभाष घोसाळकर, अनिल गायकवाड आणि मारुती जुमदे यांचा समावेश आहे. चौकशीमध्ये आयान खान याच्याविरुद्ध खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.