दहशतवाद्यांसाठी ‘नंदनवन’ असलेल्या पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधात टेरर फंडिंगचं प्रकरण सुरू असतानाच, पाकिस्ताननं त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आहे. महिन्याच्या खर्चासाठी हाफिजला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाकिस्ताननं संघाच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे.
पाकिस्ताननं विनंती केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं हाफिज सईदला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी देखील दिली आहे. यासंबंधी १५ ऑगस्टलाच पत्र पाठवले आहे. पाकिस्तानची ही विनंती मान्य केली आहे. कारण निश्चित कालावधीत कुणीच विरोध दर्शवला नाही, असं या पत्रात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं पत्रातून पाकिस्तान सरकारलाही यासंबंधी माहिती दिली आहे. हाफिज सईद, हाजी मोहम्मद अशरफ आणि जफर इक्बाल यांना किरकोळ खर्चासाठी त्यांच्या बँक खात्यांचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. हाफिजला खाते वापरण्याची मुभा देण्याच्या अर्जावर हरकत घेण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, कुणीही विरोध दर्शवला नाही. त्यामुळं त्याला परवानगी देण्यात आली, असं संयुक्त राष्ट्रसंघानं पत्रात नमूद केलं आहे.
