हरयाणात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. हरयाणात भाजपा सत्ता स्थापन करेल, असा आशावाद हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी व्यक्त केला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते.
खट्टर यांनी आज भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी . नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. हरयाणा विधानसभा निवडणुकीत ४० जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हरयाणात सरकार स्थापन करण्यासाठी ४६ सदस्यांची आवश्यकता असून भाजपाला सहा सदस्य कमी पडत आहेत.
चार अपक्ष आणि हरयाणा लोकहित पार्टीचे गोपाल कांडा यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यापूर्वी धर्मपाल गोंडन, नयनपाल रावत आणि सोमवीर सांगवान या तीन अपक्षांनी यांनी आज सकाळी जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या तिन्ही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आहे , अशी माहिती भाजपा नेते जवाहर यादव यांनी दिली.