आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या व मुंबई शहर जिल्ह्यात येणाऱ्या वरळी मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर आता या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातून अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता तेथील १० मतदारसंघांत एकूण ८९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये वरळीतील १३ उमेदवारांसह धारावी, सायन कोळीवाडा, भायखळा व मुंबादेवीत प्रत्येकी ११ उमेदवार, मलबार हिलमध्ये १० उमेदवार तसेच कुलाब्यात आठ, वडाळ्यात सहा तर माहीम विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी चार उमेदवार आता रिंगणात आहेत.
९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे. हरयाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे. हरयाणात १ कोटी ८२ लाख ९८ हजार ७१४ मतदार आहेत.
