पाकिस्तान कराची जवळ क्षेपणास्त्र चाचणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी कराची शहरातील हवाई क्षेत्राचा काही भाग ३१ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कराची जवळ असलेल्या सोमियानी टेस्ट रेंजवर पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पाकिस्तानने नोटॅम जारी केला आहे. पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून(सीएए) याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटॅमच्या नोटीसमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांना कराची हवाई हद्दीतील तीन मार्गांवरुन विमान वाहतूक टाळण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत. इम्रान खान सरकार भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत आहे असे पाकिस्तानचे तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी म्हटले आहे.
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत. भारताने २६ फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली होती. पण त्यात पाकिस्तानचे दुप्पट आर्थिक नुकसान होत असल्यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द पुन्हा खुली केली. आता इम्रान खान यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. काश्मीर सोडा पीओके वाचवा असा सल्ला विरोधकांनी त्यांना दिला आहे.
