नियंत्रण रेषेजवळ मागच्या तीन आठवडयात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या १० पेक्षा जास्त कमांडोंचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून नियंत्रण रेषेवर आक्रमकता दाखवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे.
पाकिस्तानी सैन्य भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होते तसेच शस्त्रसंधी मोडून दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आतापर्यंत एसएसजीचे १० कमांडो ठार झाले आहेत असे सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले.
काश्मीर प्रश्नावर जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तानचा नुसता आटापिटा सुरु आहे. अमेरिकेसह जगाने यामध्ये लक्ष घालावे यासाठी अण्वस्त्र युद्धाचीही धमकी दिली जात आहे. घुसखोरांना मदत करण्यासाठी तसेच भारतीय सैनिकांविरोधात बॅट फोर्सचा वापर करण्यासाठी पाकिस्तानने मागच्या १५ दिवसात १०० पेक्षा जास्त एसएसजी कमांडो नियंत्रण रेषेजवळ तैनात केल्याची सूत्रांची माहिती आहे. पाकिस्तानी सैन्य तसेच दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावण्यासाठी भारतीय सैन्य सीमेवर पूर्णपणे हायअलर्टवर आहे.
