देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लष्करप्रमुख बिपिन रावत या महिन्याच्या 31 तारखेला निवृत्त होत असून, त्यांच्या जागी नरवणे यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. नरवणे मूळचे पुण्याचे असून आकाशवाणीच्या माजी वृत्तनिवेदक सुधा नरवणे यांचे ते पुत्र आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचं त्यांनी नेतृत्व केलं.
आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे महानिरीक्षक, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातले मुख्याधिकारी, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महूस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
