मुंबई: ‘घाटकोपर-विक्रोळी दरम्यान इंटरनेटला रेंज नसणे’, ‘ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात ‘बफरचा’ सामना करावा लागणे’, या त्रासापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना ही सुविधा वापरता येणार आहे.
लोकलमध्ये प्रवास करताना तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांचा खोळंबा होतो. अनेक वेळा लोकल प्रवास करताना इंटरनेटच्या समस्या उद्भवतात. यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडते. मुंबईकरांना विना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल डब्यात वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला.
मध्य रेल्वेवरील १६५ लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. याचा वापर करण्यासाठी प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होईल, अशी माहिती अधिकृत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या सुविधांचा प्रवाशांना लाभ घेता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला असून या करारानुसार मध्य रेल्वेच्या तिजोरीतही लाखो रुपयांची भर पडणार आहे.
या सुविधेमुळे तांत्रिक बिघाड, मेल-एक्स्प्रेसला जाण्यासाठी लोकल थांबवणे अशा त्रासामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना काहीअंशी नक्कीच समाधान मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.