भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विशाखापट्टणम इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताना वेस्ट इंडिजचा १०७ धावांनी धुव्वा उडवला आणि मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली.
नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्याचा वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा निर्णय रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी तब्बल २२७ धावांची सलामी देत चुकीचा ठरवला. दोन्ही सलामीवीरांनी शतकं ठोकली.
त्यातही रोहित शर्मानं १५९ धावा फटकावून भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी केवळ २४ चेंडूत ७३ धावांची झंझावाती भागीदारी रचत भारतीय संघाला खूप मोठी धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाच्या दबावाखाली वेस्ट इंडिजचा संघ भारतीय माऱ्याला तोंड देऊ शकला नाही.
कुलदीप यादवची हॅटट्रिक आणि शमीच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा डाव २८० धावात आटोपला. कुलदीप यादवची ही दुसरी हॅटट्रिक असून, असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.