कर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यावर, ११ वाजेपर्यंत १७ पूर्णांक ६ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली. १५ जागांसाठी १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपा आणि काँग्रेसनं सर्व १५ जागांवर आपापले उमेदवार उभे केले आहेत, तर धर्मनिरपेक्ष जनता दल १२ जागांवर निवडणूक लढवत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या १४ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या आमदारांवर झालेल्या कारवाईमुळे या राज्यातलं काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीचं सरकार कोसळलं होतं.
मात्र, मे २०१८ मध्ये १७ पैकी दोन जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात प्रकरण दाखल असल्यानं त्या जागा वगळून उर्वरित १५ जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत आपलं बहुमत कायम राखण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकि किमान ६ जागा जिंकाव्या लागणार आहेत.