पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं. मुंबईत आल्यानंतर नरेंद्र मोदी विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यानंतर नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ होणार आहे. यावेळी तीन नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन तसेच पहिल्या कोचचे आणि बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ असे मेट्रोचे तीन नवे मार्ग मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ालाही कवेत घेणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या तीन नवीन मेट्रो मार्गाना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. या तीन नवीन मार्गामुळे मेट्रोच्या जाळ्यात ४२ कि.मी.ची वाढ होईल.
भविष्यात मुंबई महाप्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण ३३७ कि.मी. मेट्रो जाळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या ३२ मजली मेट्रो भवनाचे भूमिपूजनदेखील याच वेळी केले जाईल. या मेट्रो भवनात एक लाख १४ हजार ८८ चौरस मीटर जागेवर मेट्रोचे संचलन-नियंत्रण, मेट्रो प्रशिक्षण केंद्र, सिम्युलेटर्स आणि तांत्रिक कार्यालये असतील. ‘महामुंबई मेट्रो ब्रॅण्ड व्हिजन’ पुस्तिकेचे प्रकाशनदेखील या वेळी होणार आहे.
