बारा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर उद्या गुरुवारी मुंबईभरातील चौपाट्या आणि तलावांमध्ये विघ्नहर्त्या बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन मिरवणुकांवर विरजन येऊ नये म्हणून संपूर्ण मुंबईत ५० हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन सोहळा आणि मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत १२९ ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच आणि मार्वे बीच येथे मोठ्याप्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. लालबागच्या राजचे विसर्जनही १२ व्या दिवशीच करण्यात येते. यावेळी प्रचंड मोठी विसर्जन मिरवणूक निघते. या मिरवणुकीमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत लालबागच्या राजाप्रमाणेच अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुका निघत असतात. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्बशोधक आणि निरोधक पथक, शीघ्रकृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
