पुरामुळे पुणे विभागात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५४ झाली असून, चारजण अद्याप बेपत्ता आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नद्यांची पाणी पातळी ही धोका पातळीपेक्षा कमी झाली असून, दोन्ही जिल्ह्यांमधील पूरस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत पूरग्रस्तांना १६ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप झाले आहे. सर्वेक्षणात १९ हजार ७०२ घरांचे आणि ५२६ गोठ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे’, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले. दरम्यान, कोल्हापुरातील पाच गावांना अजूनही पुराचा वेढा पडलेला आहे.
पुरामुळे संपर्क तुटलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्व गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पाच गावे अद्यापही पुराच्या पाण्याने वेढली आहेत. या गावांतील २० हजार ५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
राज्य सरकारने ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना दहा हजार रुपये, तर शहरी कुटुंबांना १५ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पाच हजार रुपये रोख स्वरुपात देण्यास सुरुवात झाली असून, उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. विभागातील ३३ हजार ७७५ पूरग्रस्त कुटुंबांना १६ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. नुकसान झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, एक हजार १६ घरांची पूर्णत:, तर १८ हजार ५३३ घरांची अंशत: अशा १९ हजार ७०२ घरांचे आणि ५२६ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
