गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातल्या नद्यांना पूर आला आहे.
दुष्काळी भागातल्या अनेक गावातले नाले, ओढे दुथडी भरून वाहत असून, तलाव ओसंडून वाहत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला पूर आल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. जत तालुक्यातही बोर नदीला पूर आला, शिराळा आणि वाळवा तालुक्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे, भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वाळवा तालुक्यात वारणा गावाकडे जाणाऱ्या मार्ग दहा फुटाने खचला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धुळे जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचं वातावरण आहे. शहरासह जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. धुळे शहरात सकाळी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासात शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पाऊस झाल्यानं अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे.
औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातही आज जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पाऊस झाला.
अंबड तालुक्यात वडीगोद्री मंडळात ८१ मिलीमीटर तर जाफ्राबाद तालुक्यात टेंभुर्णी मंडळात ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पालघर जिल्ह्यात सकाळ पासून पावसाचं वातावरण कायम आहे. सकाळपासून कुठे कुठे अधून मधून रिमझिम पाऊस पडत आहे. सध्या पालघरमध्ये सर्वत्र आभाळ अंधारून आलं आहे.
