भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जाडेजानं इतिहास रचला आहे. जाडेजाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरला बाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या २०० विकेट पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जाडेजा १० वा गोलंदाज ठरला आहे.
रवींद्र जाडेजा यानं ही किमया केवळ ४४ कसोटी सामन्यात साधली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटीआधी रवींद्र जाडेजाच्या नावावर १९८ विकेटची नोंद होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात जाडेजाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेन पीटला बाद करी १९९ विकेटचा टप्पा पार केला. शुक्रवारी अखेरच्या सत्रात त्यानं एल्गरला बाद करीत आपल्या २०० विकेट पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०० विकेट घेणारा जाडेजा हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २०० विकेट घेण्याच्या यादीत आर. अश्विन हा पहिला गोलंदाज आहे. अश्विनने सर्वात वेगवान ३७ कसोटीत २०० विकेट घेतल्या आहेत. जाडेजा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा स्पिनर रंगना हेराथ याच्या नावावर होता.
रवींद्र जाडेजानं २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नागपूरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण झाले होते. कसोटी क्रिकेटमध्ये जाडेजाने नऊ वेळा पाच गडी आणि एक वेळा १० गडी बाद करण्याची किमया साधली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. भारताचे सलामीवीर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि रोहित शर्माने केलेल्या खणखणीत १७६ धावांच्या जोरावर भारताने सात गडी बाद ५०२ धावांवर डाव घोषित केला आहे.
