मुंबई माहिम-किंग्जसर्कल विभागातील अनधिकृत झोपडपट्टीमधील रहिवाशांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे बुधवारी हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रुळांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे लोकल रुळांवरून घसरली. रुळांवरील कचऱ्यामुळे लोकल घसरल्याची ही दुसरी घटना असून यामुळे रुळांशेजारी असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या झोपडपट्टीचा वाद मिटवण्यात रेल्वे आणि महापालिकेला सातत्याने अपयश येत असून दोन्ही प्रशासनांची याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी-वांद्रे लोकल माहीम स्थानकात पोहचण्यापूर्वीच प्रचंड मोठा आवाज झाला. लोकलमधील प्रवाशांना जोरदार धक्का बसला. भीतीमुळे प्रवाशांनी लोकलबाहेर उड्या घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेतली. डब्यांखाली पाहिले असता रुळांवरून लोकल घसरल्याचे दिसून आल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेले प्रवासी गणेश वाघमारे यांनी सांगितले.
लोकल घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘वांद्रे स्टेशनकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या बाजूच्या तिसऱ्या डब्याचे चार चाक रुळांवरून घसरले. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. दुपारी ३.३२ मिनिटांनी सीएसएमटीवरून वांद्रेकडे जाणारी पहिली लोकल रवाना करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. ही दुर्घटना आणि मध्य रेल्वेवरील सुट्टीच्या वेळापत्रकांमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या बहुतांश स्थानकात गर्दी उसळली होती.
माहीम-किंग्जसर्कल स्थानकादरम्यान याच पट्ट्यात ऑगस्ट २००७ मध्ये लोकलचे पाच डबे घसरले होते. यात सहा प्रवासी जखमी झाले. या पट्ट्यातील रुळांची योग्य देखभाल होत नसल्याने हा विभाग प्रवाशांसाठी धोकादायक ठरला आहे. या पट्ट्यात अनधिकृत वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. येथील झोपड्यांचे बांधकाम पक्के आहे. याबाबत रेल्वेकडून महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून, तसेच तोंडीही सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून झोपड्या हटवण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात येते. रेल्वेने हटवण्याचा प्रयत्न केला असता पर्यायी जागा द्या तरच जागा खाली करू, अशी मागणी या नागरिकांकडून होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
