दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट जवळील युसूफ बिल्डिंगचा मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक भाग कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबललेल्या १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. यात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
फोर्ट येथे क्रॉफर्ड मार्केटजवळील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथे युसूफ बिल्डिंग आहे. ही इमारत तळमजला अधिक चार मजली आहे. आज रात्री सव्वा नऊच्या सुमारास इमारतीच्या उत्तरेकडील काही भाग कोसळला. त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली होती. स्थानिकांनी तात्काळ इमारतीच्या दिशेने भाग घेऊन ढिगारा उपसण्याचे काम केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
