उकाडा आणि पाणीटंचाईने हैराण झालेल्या पुणेकरांची मान्सूनची प्रतीक्षा सोमवारी संपली. सकाळपासूनच दाटून आलेले ढग दुपारनंतर बरसले आणि पुणे वेधशाळेने मान्सून पुण्यात दाखल झाल्याचे जाहीर केले. गेल्या र्षीच्या तुलनेत मान्सून यंदा दहा दिवस उशिरा दाखल झाला. मान्सूनने आता राज्याचा मुंबई आणि कोकणातील काही भाग वगळता ९२ टक्के भाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सूनची प्रगती कायम राहणार असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शहरात सोमवारी सकाळपासून ढग दाटून आले होते. दुपारी बारानंतर जोरदार सरी बरसल्या आणि या हंगामातील रिपरिप पडणारा पहिला पाऊस पुणेकरांनी अनुभवला. पुण्यात दिवसभरात २ मिलीमीटर, तर लोहगावमध्ये ६३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील वातावरण आल्हाददायक अनुभवायला मिळाले. शहरासह जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मान्सूनने आता कोकणाचा बहुतांश भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील दोन दिवसांत उर्वरित राज्यातही पाऊस दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासांत कोकण, गोव्यात, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
