पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ७ वर पोचला आहे.
या चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यांमधल्या सुमारे २ लाख ७० हजाराहून अधिक लोकांचं नुकसान झालं, २६ हजारांहून अधिक घरांची पडझड झाली, तसंच पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे अशी माहिती पश्चिम बंगालचे राज्य आपत्ती व्यवस्थापनमंत्री जावेद खान यांनी दिली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य प्रशासन लवकरच पथकं रवाना करणार असल्याचंही जावेद खान यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीविषयी माहिती घेतली. या दोघांनीही केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करेल असं आश्वासन बॅनर्जी यांना दिलं.
दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्रालय सतत लक्ष ठेवून असून, केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणांच्याही सातत्यानं संपर्कात आहे.
