पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पावसाची विश्रांती असल्याने शहरातील कमाल तापमान पुन्हा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पावसानंतर ते कमी होत जाईल, असाही अंदाज आहे.
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यात तब्बल २३ नागरिकांचे बळीही गेले. २५ सप्टेंबरला रात्री शहरात सर्वाधिक पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभरात आकाशात ढग जमा होतात. मात्र, काही वेळातच ते निघून जात लख्ख ऊन पडते आहे. त्यामुळे २७ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेल्या कमाल तापमान दोन दिवसांपासून ३० अंशांपुढे गेले आहे. बुधवारी शहरात ३०.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरही एक- दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, ४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ५ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. ६ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
