नवरात्रोत्सवातील दांडिया नृत्यासाठी घागरा, चुनरी, टिपऱ्यांसह ऑक्साइड दागिन्यांची क्रेझ आली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ दांडियासाठी आलेल्या अनेक वस्तू व साहित्याने कलरफूल झाली आहे. पारंपरिक पद्धतीने दांडिया खेळण्यासाठी तरुणाई खास गरबा नृत्यासाठी खरेदी करत आहे.
पाच दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. रविवारी घटस्थापना असल्याने या दिवसापासूनच दसऱ्यापर्यंत रोज रात्री रास गरब्याचे फेर रंगणार आहेत. यावर्षीही गरब्यासाठी बाजारपेठेत वैविध्यपूर्ण ड्रेस, ज्वेलरी, सजवलेल्या दांडिया दाखल झाले आहे. मुलींच्या ड्रेसमध्ये घागरा चोलीला जास्त मागणी आहेत. यामध्ये बांधणी, कॉटन बेसवर आबलावर्क व जरदोजी वर्कसह लटकन, कुंदन लावलेल्या ओढण्यांसह असलेल्या घागऱ्याची खास खरेदी केली जात आहे. दरवर्षी लाल, पिवळा, गुलाबी, भगवा या रंगांची क्रेझ असते. यंदा या रंगांसोबत मरून, आयव्हरी आणि ब्लॅक कलरलाही मागणी वाढली आहे. घागऱ्यात यावर्षी रेड आणि ब्लॅक हे कॉम्बीनेशन इन फॅक्टर आहे. यामध्येही ए लाइन व अंब्रेला या दोन्ही स्टाइल फॉर्मात आहेत.
मुलांच्या ड्रेसमध्ये पारंपरिक राजस्थानी ड्रेसची चलती आहे. यामध्ये कुर्ता, धोती व फेटा असा सेट खास गरब्यासाठी खरेदी केला जात आहे. यामध्ये पिवळ्या रंगाच्या शेड्स जास्त खरेदी केल्या जात आहेत. मुलींच्या ज्वेलरीत कमरपट्टा, बिंदी, नथनी, बांगड्या, पायातील कडे या दागिन्यांची व्हरायटी लक्ष वेधून घेत आहे. व्हाइट मेटल, ऑक्साइड, मोती, कुंदन, खडे या प्रकारच्या हेवी ज्वेलरीचे सेट दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. रंगबेरंगी बांगड्यांच्या शेकडो व्हरायटींनी बाजारपेठ फुलून गेली आहे. ज्वेलरीमध्येही आरसे जडवलेल्या दागिन्यांना मागणी आहे. तसेच यंदा फ्लॉवर ज्वेलरीचाही फंडा बाजारात आला आहे. मुलांच्या दागिन्यांमध्ये बाली, कडं यांची खरेदी जोरात सुरू झाली आहे. मुलं व मुली मोजडी यांचीदेखील हमखास खरेदी करत आहेत. यात सिल्कबेस मोजडीला डिमांड वाढला आहे.
सजवलेल्या दांडियांमध्ये घुंगरू लावलेल्या दांडियांनी बाजारपेठ सजली आहे. तसेच लाकडी रंगवलेल्या पारंपरिक दांडिया, स्टिलच्या दांडिया व जरीने सजवलेल्या दांडिया खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. महाद्वार रोड, राजारामपुरी, जोतिबा रोड, बाजारगेट या परिसरात दांडियासाठी फुललेल्या बाजारपेठेने नवरात्रौत्सवाची चाहूल गडद केली आहे.
