इस्रोने चांद्रयान २ ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून घेतलेली चंद्राची छायाचित्रे जारी केली आहेत. ऑर्बिटरच्या हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यातून काढलेल्या या छायाचित्रांमधून चंद्राची वेगळीच झलक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑर्बिटरमधून काढलेल्या छायाचित्रांद्वारे विक्रम लँडर नेमकं कुठे आहे, त्याची माहिती मिळाली असल्याचेही इस्रोने सांगितले. चांद्रयान साडेसात वर्षे चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे.
चंद्राभोवती फिरतेय चांद्रयान
७ सप्टेंबरला विक्रम लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग होऊ शकली नव्हती आणि विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला होता. नंतर लँडरचे हार्ड लँडिंग झाल्याचे नासा आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले होते. आताही चंद्राच्या कक्षेत चांद्रयान – २ चं ऑर्बिटर आहे, जे साडेसात वर्षांपर्यंत आपलं काम करत राहणार आहे. याच ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून चंद्राची नवी छायाचित्रे समोर आली आहेत.
१०० कि.मी. अंतरावरून चंद्राला न्याहाळत आहे ऑर्बिटर
चंद्राचा आजवरचा इतिहास, चंद्रावर आजपर्यंत झालेले बदल, चंद्राची संरचना, चंद्रावरील खनिज संपत्ती, पाणी या सर्व गोष्टींची माहिती व अभ्यास इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेमुळे मिळणे शक्य होणार आहे. भारताकडून पाठवण्यात आलेला ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत स्थिरावला असून, तो चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर आहे. २२ जुलै रोजी लाँच केलेल्या चांद्रयान २ मधील लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते आणि ऑर्बिटरवर चंद्राच्या कक्षेत फिरत राहून माहिती गोळा करण्याची जबाबदारी होती ७ सप्टेंबर रोजी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी २.१ कि.मी. अंतरावर असताना त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. हा संपर्क अद्याप पुनर्प्रस्थापित झालेला नाही.
