अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असं राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत ६५ मिलिमीटर इतका पाऊस झालेल्या ठिकाणीच पंचनामे केले जात होते. मात्र, त्यात अवकाळी किंवा अतिवृष्टीचा समावेश नव्हता. आता आर्थिक मदत देण्याच्या नियमांमध्ये अवकाळी पावसाचा समावेश झाल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरतील, असं खोत यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील आज नाशिकचा दौरा करत आहेत. इगतपुरी, कळवण तसंच बागलाण तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पवार पाहणी करत आहेत.
