नौदलाच्या ताफ्यात असलेल्या ‘आयएनएस शिशुमार’ या सर्वात जुन्या पाणबुडीला आता नवे रूप येणार आहे. या पाणबुडीची कालमर्यादा वाढवण्यासाठी त्याच्या महत्त्वाच्या डागडुजीचे काम सध्या माझगाव डॉकमध्ये सुरू आहे. ही डागडुजी पुढील दोन वर्षे चालणार आहे.
आयएनएस शिशुमार’ ही मूळ जर्मन बनावटीची पाणबुडी १९८६ दरम्यान नौदलाच्या ताफ्यात आली. सध्या नौदलात कार्यरत असलेली ही सर्वात जुनी पाणबुडी आहे. यानंतर याच श्रेणीतील ‘आयएनएस शंकुश’ हीदेखील थेट जर्मनीतून भारतात दाखल झाली. या दोन पाणबुड्यांच्या अभ्यासातून माझगाव डॉकने आयएनएस शाल्की व आयएनएस शंकुल या दोन पाणबुड्या अनुक्रमे १९९४ व १९९६ मध्ये तयार करून नौदलाकडे सुपूर्द केल्या. आता यापैकी ‘आयएनएस शिशुमार’ ही सर्वात जुनी पाणबुडी असल्याने त्याची डागडुजीदेखील माझगाव डॉकमध्येच सुरू आहे.
सूत्रांनुसार, माझगाव डॉकने जर्मनीच्याच थायसेनक्रूप मरीन सिस्टीम्सच्या सहकार्याने हे काम सुरू केले आहे. नौदलाने हे १५१ दशलक्ष डॉलरचे (सुमारे ९८१ कोटी रुपये) काम माझगाव डॉकला दिले आहे. या डागडुजीनंतर आयएनएस शिशुमारची कालमर्यादा जवळपास २० वर्षांनी वाढणार आहे. या कामासाठी ही पाणबुडी माझगाव डॉकमध्ये आली असून डागडुजीदेखील सुरू आहे. २०२१ पर्यंत ही पाणबुडी नवीन रूपात नौदलाला सुपूर्द करायची आहे.
