झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ पासून मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येईल. चतरा, पलामू, गुमला, गढ़वा, लातेहार आणि लोहरदग्गा या सहा जिल्ह्यात मिळून १३ मतदारसंघामध्ये ३७ लाख ८३ हजारापेक्षा अधिक मतदार आपला हक्क बजावत आहेत. हे सगळे मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
एकूण ४ हजार ८९२ मतदान केंद्रांपैकी १ हजार ७९० केंद्र अतिसंवेदनशील तर बाराशेहून जास्त केंद्र संवेदनशील आहेत. केंद्रीय निमलष्करी दलाचे ३५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. या टप्प्यात १५ महिला उमेदवारांसह १८९ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.