भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. देशभरात ‘एलआयसी’च्या विविध कार्यालयांमध्ये सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक पदांसाठी ही भरती केली जाणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
‘एलआयसी’कडून २४ वर्षांनंतर पदभरती केली जात असून, या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ‘असिस्टंट क्लार्क’ पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३० एवढी असून, नियमानुसार मागासवर्गीयांसाठी वयाची सवलत आहे. कोणत्याही विषयातील पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग अॅबिलिटी, न्यूमेरिकल अॅबिलिटी आणि इंग्रजी हे तीन विषय असून, ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी आदी ठिकाणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
