सणासुदीनिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील सेलमुळे Amazon आणि Flipkart या इ-कॉमर्स झाल्या मालामाल .
काही दिवसांपूर्वी सणासुदीनिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील सेलमुळे Amazon आणि Flipkart या इ-कॉमर्स कंपन्या चांगल्याच मालामाल झाल्या आहेत. 29 सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दरम्यान अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळांवर विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. या अवघ्या सहा दिवसांच्या सेलमध्ये दोन्ही कंपन्यांनी तब्बल 19 हजार कोटी रुपयांच्या सामानाची विक्री केली आहे.
बेंगळुरूची रिसर्च कंपनी रेडसीर कंसल्टंसीच्या (RedSeer Consultancy) आकडेवारीनुसार, सेल दरम्यानच्या सहा दिवसांच्या विक्रीमध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनची भागीदारी तब्बल 90 टक्के होती. यात सर्वाधिक वाटा मोबाइल विक्रीचा होता. विक्री झालेल्या सामानांमध्ये ५५ टक्के विक्री मोबाइलच्या श्रेणीतून झाली. सणासुदीच्या काळातील पहिल्या टप्प्यातील सेलमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑक्टोबर महिन्यात फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या ऑनलाइन विक्रीचा आकडा 39 हजार कोटी रुपये होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
“आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही सणासुदीच्या सेलमधील पहिल्या टप्प्यात विक्रमी तीन अब्ज डॉलरच्या सामानाची विक्री झाली. यातून ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात येतोय तसंच ऑनलाइन खरेदीला ग्राहकांची पसंती असल्याचे हे संकेत आहेत”, असं रेडसीर कंसल्टिंगचे संस्थापक आणि सीईओ अनिल कुमार म्हणाले.