भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करणारा औद्योगिक सुरक्षाविषयक करार झाला आहे. वॉशिंग्टन इथं दुसऱ्या दोनास दोन संवादात दोन्ही देशांनी या करारावर सह्या केल्या.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात काल दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षाविषयक विविध मुद्यांवर चर्चा झाली. या चर्चेला भारताच्या वतीनं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तर अमेरिकेच्या वतीनं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण सचिव मार्क एस्पर उपस्थित होते.
भारत आणि अमेरिका याचे संबंध बळकट असून त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचं दोन्ही देशांच्या वतीनं घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं. भारत- प्रशांत क्षेत्र मुक्त, शांत आणि सुलभ संचारयोग्य असावं, असा दोन्ही देशांचा सामाईक दृष्टिकोन आहे, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. तसंच व्यापारविषयक मुद्यांवरही संक्षिप्त चर्चा झाली.
