गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात हजेरी लावली असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून आज दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.
आज सकाळपासून दक्षिण मुंबई, तसेच उपनगरांतील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, अंधेरी, जोगेश्वरी बोरिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याच बरोबर ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच वसई, विरार परिसरातही पाऊस सुरू झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या बरोबरच नवी मुंबईत वाशी, बेलापूर आणि पनवेलमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच मुंबईतील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याणमधील चिखलघर परिसरातही पाणी साचल्याचे वृत्त आहे.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
