रात्रीच्या वेळी अडचणीत सापडलेल्या मुली, महिलांच्या मदतीसाठी ‘सारथी’ नावाचा नवीन उपक्रम पोलिस प्रशासनाने सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत संकटात असलेल्या महिला किंवा मुलींनी मदत मागितल्यानंतर पोलिसांचे ‘सारथी’ वाहन तातडीने घटनास्थळी जाऊन मदत करणार आहे. रात्री घरी जाण्यास उशीर झाल्यास संबंधित महिलेला तिच्या घरी नेऊन सोडण्याचेही काम करणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्षाबंधनानिमित्त शहरातील शाळांमध्ये जाऊन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुलींकडून राखी बांधून घेऊन ‘खाकी विथ राखी’ हा उपक्रम राबविला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून आता ‘सारथी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्वांतत्र्यदिनानिमित्त सारथी गाडीचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहराचे उपअधीक्षक संदीप मिटके आदी उपस्थित होते. अडचणीत, संकटात सापडलेल्या महिलांना, मुलींना दिवसा पोलिस, नागरिकांकडून मदत मिळते. परंतु रात्रीच्या वेळी लगेच मदत मिळत नाही. पोलिस वेळेवर पोहोच नाहीत. त्यामुळे महिलांच्या मदतीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही घेतो, काळजी महिला व मुलींची (सारथी) असा उपक्रम आहे. या उपक्रमात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत महिलांना मदत केली जाणार आहे. या सारथी वाहनांमध्ये एक महिला व एक पुरुष कर्मचारी असणार आहे. महिलांच्या मदतीसाठी असलेल्या दिलासा सेल मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
