मध्य रेल्वेवरील मुंब्रा-कळवा स्थानकादरम्यान गर्दीनं खचाखच भरलेल्या एका लोकलमधून तिघे जण पडल्याचे वृत्त आहे. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तिघांनाही उपचारासाठी कळव्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसामुळं गेले दोन दिवस कोलमडलेली मध्य रेल्वे आज सुरू झाली खरी, मात्र प्रशासनानं गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रोजच्या तुलनेत लोकल मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या आज कमी आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. गाड्यांमध्ये प्रवेश करणंही कठीण झालं आहे. गर्दीनं भरलेल्या अशाच एका गाडीतून पडून तिघे जखमी झाले आहेत. नाजिमा शेख असं जखमी महिलेचं नाव आहे. अन्य दोघांची नावं कळू शकलेली नाहीत.
