पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या अंतर्गत तपास पथकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. बँकेच्या नोंदींतून एकूण १०.५ कोटी रुपये गहाळ असल्याचे या पथकाने म्हटले आहे. एचडीआयएल आणि त्यासंबंधित कंपन्यांनी दिलेले अनेक धनादेश या पथकाला सापडले आहेत. हे धनादेश कधीही बँकेत जमा झाले नाहीत, तरीही त्यांना रोख रक्कम देण्यात आली. तसेच, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की हा घोटाळा ४,३५५ कोटींचा नाही तर ६,५०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आहे!
पीएमसी बँकेच्या अंतर्गत तपासणी पथकाला मिळालेल्या धनादेशांची किंमत १० कोटींपेक्षा जास्त आहे. उर्वरित ५०-५५ लाख रुपयांचा कुठलाही हिशेब नाही. या व्यतिरिक्त बँक अधिकाऱ्यांनी यापूर्वी घोटाळ्याची रक्कम ४,३५५ कोटी रुपये असल्याची नोंद केली होती, जी आता ६,५०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
बँकेच्या रेकॉर्डमधून केवळ १०.५ कोटी रुपये गहाळ झाल्याची माहिती मिळाली आहे. आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या आदेशाने बँकेच्या आर्थिक व्यवहारांची अंतर्गत चौकशी केली जात आहे. या तपासणीतच घोटाळ्याची रक्कम जास्त असल्याची माहितीही समोर आली आहे.
एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांना रोकड हवी होती असे तपासात उघड झाले आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षात बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना धनादेश पाठविले. थॉमस यांनी त्यांना रोख रक्कम दिली पण धनादेश बँकेत जमा केले नाहीत. बँकेच्या रेकॉर्ड बुकमध्ये चेकची एन्ट्री नाही. थॉमस यांनी ५०-५५ लाख रुपये स्वत:कडे ठेवल्याचाही संशय व्यक्त होत आहे.
