ठाणेकरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास आगामी काळात आरामदायी व थेट होणार आहे. वडाळा ते ठाणे कासारवडवली मेट्रो-४ मार्गाचा विस्तार थेट दक्षिण मुंबईतील सर्वसाधारण टपाल कार्यालयापर्यंत (जीपीओ) करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्ताराबाबत एमएमआरडीए व मुंबई पोर्ट ट्रस्टमधील खर्चाबाबतची बोलणी यशस्वी झाल्याने या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत.
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या मार्गाचा ‘जीपीओ’पर्यंत विस्तार करण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रस्ताव होता. मात्र या टप्प्याचा खर्च कुणी करायचा, यावरून वाद होता. मात्र, भूखंड देण्याबाबत पोर्ट ट्रस्टच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. आता केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. केंद्रातही भाजप सरकार असल्याने मंजुरी मिळण्यात अडचण येणार नाही, असे मानले जात आहे.
वडाळा ते जीपीओ भूमिगत मेट्रो
मेट्रो-४ मार्गातील वडाळा ते जीपीओपर्यंतच्या या टप्प्यात अनेक हेरिटेज वास्तू असल्याने या भागातील विस्तार भूमिगत असावा, असेही एमएमआरडीएचे म्हणणे होते. मात्र एलिव्हेटेड मार्गाच्या तुलनेत भूमिगत मार्गासाठी खर्च तिप्पट असल्याने, वाढीव खर्चाचा मुद्दाही कळीचा बनला होता. विस्तारित मार्गासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट थेट निधी देणार नसले तरी त्यांच्या मालकीचे काही व्यावसायिक भूखंड एमएमआरडीएला देणार आहे. या भूखंडांची किंमत विस्तारित मार्गाएवढी असेल. त्यामुळे आता वडाळा ते जीपीओ विस्तार भूमिगत असेल.
वडाळा ते जीपीओपर्यंतचा पट्टा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित आहे. या भागातून मेट्रो गेल्यास पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनाही फायदा होईल, त्यामुळे या टप्प्यातील खर्च पोर्ट ट्रस्टने करावा, अशी एमएमआरडीएची मागणी होती. मात्र, सध्या पूर्व किनारपट्टीवर आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, मोकळ्या भूखंडांचा विकास करायचा आहे, त्यामुळे आम्हालाच निधीची गरज आहे, परिणामी पैसे देणे शक्य नाही, अशी भूमिका पोर्ट ट्रस्टची होती. मात्र या संदर्भात वरिष्ठ स्तरावर झालेली बोलणी यशस्वी ठरल्याने विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
