उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीमुळे सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार असून, याचा फटका रिक्षा, टॅक्सी वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील वडाळा येथीसल एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याचे महानगर गॅस कंपनीने(एमजीएल) म्हटले आहे. मात्र, याचा स्थानिक पीएनजी ग्राहकांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचा एमजीएलचा प्रयत्न असेल असे महानगर गॅस कंपनीने म्हटले आहे.
या दुर्घटनेनंतर गॅस पुरवठा पाइपलाइमधून कमी दाबाने गॅस पुरवठा होत असल्याने मुंबई आणि परिसरातील अनेक सीएनजी स्टेशन्सवर सीएनजीची कमतरता जाणवू शकते असे कंपनीने म्हटले आहे. या बरोबरच औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी आपल्या इंधनासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचनाही कंपनीने केली आहे. ओएनजीसीचे कामकाज पूर्ववत सुरू झाल्यानंतर एमजीएल नेटवर्क असलेल्या ठिकाणांवर नियमीत गॅस पुरवठा सुरू करण्यात येईल असेही कंपनीने जाहीर केले आहे.
