नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील आंदोलनामुळे राजधानी दिल्ली गुरुवारी पुन्हा ढवळून निघाली. दिल्लीतील मंडी हाऊस, लाल किल्ला आणि जंतर-मंतर येथे झालेल्या निषेध आंदोलनात हजारोंच्या संख्येने आंदोलक सामील झाल्यामुळे केंद्र सरकारला तब्बल वीस मेट्रो स्थानके बंद करावी लागली. अनेक भागांमध्ये इंटरनेटसह सर्वप्रकारची मोबाइल सेवा बंद करण्याची वेळ आली तर दिल्लीकडे येणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आल्यामुळे राजधानी दिल्ली दिवसभर ठप्प आणि विस्कळीतही झाली.
नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांचे तसेच डाव्या पक्षांचे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये कलम १४४ लावण्यात आले. मोबाईल सेवा अनेक तासांसाठी बंद करण्यात आली. माकपचे सरचिटणीस, माजी खासदार सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, माजी खासदार नीलोत्पल बसू, वृंदा करात, पतियाळाचे माजी खासदार धर्मवीर गांधी यांना मंडी हाऊस येथे अटक करण्यात आली, पूर्व दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांना लाल किल्ला येथे अटक करण्यात आली, तर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांना आयटीओ येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. आईसाच्या अध्यक्ष सुचेता डे, विद्यार्थी नेता उमर खालिद, नदीम खान आदींनाही पोलिसांनी अटक केली.
लोकांना आंदोलन स्थळांवर पोहोचणे शक्य होऊ नये म्हणून दिल्ली मेट्रो रेल्वेचा केंद्रबिंदू असलेल्या राजीव चौकासह १९ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली. या मेट्रो स्थानकांमध्ये शिरण्याची किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था बंद करण्यात आली होती. सायंकाळी जामिया मिलिया आणि जसोला विहार वगळता राजीव चौक, विश्वविद्यालय, चांदणी चौक, लाल किल्ला, जामा मशीद, दिल्ली गेट, आयटीओ, मंडी हाऊस, प्रगती मैदान, पटेल चौक, जनपथ, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, लोक कल्याण मार्ग, खान मार्केट, वसंत विहार, मुनिरका ही मेट्रो स्थानके पूर्ववत सुरू करण्यात आली.
![](https://indsamachar.com/wp-content/uploads/2020/04/logo-2.png)