हॉलिवूड सिनेमा “अवतार” साठी मला विचारण्यात आलं होतं. मात्र, मीच तो चित्रपट नाकारला. ‘अवतार’ हे नावही मीच जेम्स कॅमरुन यांना सुचवलं होतं,’ अशी वक्तव्यं करणारा अभिनेता गोविंदा याचं मानसिक आरोग्य बिघडलं असल्याची चर्चा आहे. गोविंदाच्या काही मित्रांनीही त्यास दुजोरा दिला असून त्याला मदतीची गरज असल्याचं म्हटलं आहे.
एका वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून गोविंदाच्या वागणुकीत बदल झाला आहे. त्यानं अनेक चित्रपट नाकारले आहेत. त्याच्या या वागण्यामुळं निर्मात्यांनी ‘रंगीला राजा’ चित्रपटाला नकार दिला होता. गोविंदानं त्याच्या अनेक मित्रांसोबत संबंध तोडले आहेत. आज चित्रपटसृष्टीत त्याचे कोणीच मित्र नाहीत आणि कोणीच त्याची मदत करण्यासाठी पुढे येत नाहीयेत, असंही बोललं जातंय.
एका मुलाखतीत बोलताना गोविंदानं त्याच्या करिअरमधील अनेक घटनांबद्दल चर्चा केली. त्यात त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. ‘जेम्स कॅमरुन यांनी मला ‘अवतार’ या चित्रपटासाठी विचारलं होतं. पण, त्यासाठी सलग ४१० दिवस चित्रीकरणासाठी द्यावे लागणार होते. संपूर्ण शरीर रंगवण्यासाठी बॉडी पेंटचा वापर करावा लागणार होता आणि मला ते नको होतं. म्हणून मी त्यांची माफी मागून नकार कळवला. ‘गदर’, ‘चांदनी’, ‘ताल’ आणि ‘देवदास’ या चित्रपटांच्या ऑफरदेखील मला आल्या होत्या. पण, मी त्या नाकारल्या.’ असंही त्यानं म्हटलं होतं.
