दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक पातळीवर वारंवार तोंडावर आपटूनही नकराश्रू ढाळणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेनं अल कायदा आणि अन्य संघटनांमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं होतं, असं खान यांनी सांगितलं. विशेष म्हणजे ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली अल कायदा या संघटनेनं ९/११चा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.
अमेरिकी थिंक टँक कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्समध्ये (सीएफआर) इम्रान खान यांनी ही कबुली दिली आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याआधी अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयनं प्रशिक्षण दिलं होतं. पाकिस्तान सरकारने ९/११च्या हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांबद्दलचं धोरण बदललं, मात्र पाकिस्तानी लष्कराला बदल घडवून आणायचे नव्हते, असं ते म्हणाले. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचं अबोटाबादमध्ये वास्तव्य आणि त्याचा खात्मा केला केल्यानंतर या घटनांची पाकिस्तान सरकारनं चौकशी का केली नाही, असा प्रश्न यावेळी खान यांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही चौकशी केली होती. मात्र, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयनं ९/११ हल्ल्यापूर्वी अल कायदाला प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळं या हल्ल्याशी नेहमीच संबंध जोडले गेले. त्यानंतर सरकारनं धोरण बदललं पण लष्करातील अनेक जण या निर्णयाशी सहमत नव्हते, असंही त्यांनी मान्य केलं.
