यू स्पोर्ट्समधील (स्नूकर-बिलियर्ड्स) भारताचा अव्वल जगज्जेता खेळाडू पंकज अडवाणीचा झंझावात सुरूच आहे. बुधवारी त्याने कारकिर्दीतील २३वे जगज्जेतेपद पटकावले. यावेळी स्पर्धा होती ती आयबीएसएफ जागतिक स्नूकर सांघिक स्पर्धा. आदित्य मेहतासह पंकज यांच्या भारतीय संघाने थायलंड २ संघाचा ५-२ असा पराभव करत जगज्जेतेपदाचा मान संपादला. हे जेतेपद पंकजच्या जगज्जेतेपदांमध्ये नव्हते. अखेर बुधवारी पंकजने या सांघिक जगज्जेतेपदाचा योग जुळवून आणलाच.
पंकजला तोलामोलाची साथ लाभली ती आदित्य मेहताची. आदित्यचे मात्र हे पहिलेच जगज्जेतेपद ठरले आहे. प्रकृतीच्या तक्रारींमुळे आदित्यची कारकीर्दच धोक्यात आली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत पटकावलेले हे पहिले जगज्जेतेपद आदित्यच्या कारकिर्दीला नवे वळण देईल.
या जगज्जेतेपदासह आयबीएसएफची सगळी जगज्जेतेपदे पंकजच्या नावावर जमा झाली आहेत. गेल्याच आठवड्यात पंकजने जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली आहे.
फायनलला तेवढीच जबरदस्त सुरुवात करून दिली ती आदित्य मेहताने. त्याने पहिली फ्रेम ६५-३१ अशी जिंकली. मात्र पुढील फ्रेममध्ये पंकजला ९-६९ असा अनपेक्षित पराभव पत्करावाला लागला. दुहेरीची तिसरी फ्रेम भारतीयांनी जिंकली, ज्यात आदित्यच्या ५५ ब्रेकचा मोलाचा वाटा होता. चुरशीच्या फ्रेम होत असतानाही भारतीयांनी मध्यंतराला ३-२ अशी निसटती आघाडी घेतील होती. ज्यामुळे पुढील दोन फ्रेम जिंकून जेतेपदावर नाव कोरण्याची औपचारिकता बाकी होती. पंकजने अनुभव पणाला लावत दुहेरीची दुसरी फ्रेम जिंकण्यात पुढाकार घेतला. मात्र जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करुन दिले ते आदित्य मेहताने. त्याने पुढील फ्रेम जिंकून भारताच्या सांघिक जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
