सरकारी ‘जन औषधी केंद्रां’मध्ये आजपासून (२७ ऑगस्ट) सॅनिटरी नॅपकिन एक रुपयात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन अनुदानित किंमतीत उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
हे जैवविघटनशील नॅपकिन जन औषधी केंद्रांमध्ये अडीच रुपयांना एक या किमतीत मिळत होते, ते आता एक रुपये दराने मिळणार आहेत. त्यामुळे याआधी चार नॅपकिनचे १० रुपयांना मिळणारे पाकिट आता चार रुपयांना मिळणार आहे.
‘जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्स आता एक रुपयांत उपलब्ध करत आहोत. देशभरातील ५५०० जन औषधी केंद्रांमध्ये ‘सुविधा’ या नावाने हे नॅपकिन्स उपलब्ध असतील,’ असे मांडवीय म्हणाले. हा निर्णय घेऊन मोदी सरकारने २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण केले, असेही ते म्हणाले.
‘सॅनिटरी नॅपकिन उत्पादक सध्या उत्पादन खर्चामध्ये नॅपकिन पुरवत होते. ही किंमत ६० टक्क्यांनी खाली आणण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे,’ असे मांडवीय म्हणाले.
‘जन औषधी केंद्रांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करण्याची योजना मार्च २०१८ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मे २०१८ पासून जन औषधी केंद्रांत ती राबविण्यात आली. गेल्या एक वर्षात सुमारे २.२ कोटी नॅपकिनची विक्री करण्यात आली. आता किंमत आणखी कमी केल्याने ही विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. नॅपकिनचा दर्जा, किंमत आणि उपलब्धता यावर भर देण्यात आला आहे,’ अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
