तब्बल सात तासाच्या खोळंब्यानंतर अखेर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. रात्री साडे नऊ वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पहाटे पासून सुरू असलेल्या पावसामुळे दुपारी तीननंतर पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला. चर्चगेट ते अंधेरीपर्यंतची लोकल पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तसेच अंधेरीहून विरारकडे जाणाऱ्या लोकलचाही मोठा खोळंबा झाला होता. त्यामुळे चर्चगेटकडे येणारे आणि विरारकडे जाणारे प्रवासी मध्येच लटकले होते. रेल्वेचा खोळंबा आणि पावसाची सुरू असलेली रिपरिप यामुळे प्रवाशी चांगलेच वैतागले होते.
दरम्यान, दोन तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अंधेरीहून चर्चगेटसाठी पहिली लोकल सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र अंधेरी -चर्चगेच दरम्यान धावणाऱ्या लोकलची अपूरी संख्या, दोन गाड्यांमधील मोठं अंतर आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांचा संतापाचा पारा आणखीनच चढला होता. रात्रीपर्यंत पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. मात्र साडे नऊ वाजता पश्चिम रेल्वेने जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सुरू केल्याने शेकडो प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
