कळंबोलीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव सोमवारी शाळेतील सतर्क स्टाफमुळे फसला. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या या बॉम्बमधील संशयित वस्तू निकामी केल्यानंतर मंगळवारी कळंबोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबोलीत सायन-पनवेल महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सेक्टर एक येथील शाळेसमोर सोमवारी बॉम्बसदृश वस्तू सापडली होती. नवी मुंबई पोलिसांनी सीआरपीएच्या मदतीने ही ज्वलनशील वस्तू सोमवारी रात्री उशिरा लोकवस्तीपासन दूर नेऊन निकामी केली. ज्वलनशील वस्तू निकामी केल्यानंतर शाळेच्या बाहेर ठेवलेला हा ‘टाइमबॉम्ब’ असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
५३ किलो वजनाचा ज्वलनशील पदार्थ, बॅटरी, घड्याळ आणि शेजारी पाच लिटर पेट्रोल असलेली बाटली आढळून आली होती. शाळेतील शिपाई आणि सुरक्षारक्षकाला याबाबत वेळीच संशय आल्यामुळे हा बॉम्ब निकामी करता आला.
