पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. रिओत झालेल्या वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळविल्यामुळे भारतीय नेमबाजांवरचा विश्वास आता आणखी वाढला आहे. या वर्षीच्या चार वर्ल्डकपमध्ये भारताने एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. त्यातच १० मीटर एअर रायफल नेमबाजी महिला गटाच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या अपूर्वी चंडेला, अंजुम मुदगिल आणि वलरिव्हन एलावेलिन यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविल्यामुळे एकूणच भारताने नेमबाजीत जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळविले आहे.
भारताचे युवा नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र गटात सुवर्णयश पटकावले. याच प्रकारात भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली.
या वर्षाच्या चारही वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी निर्विवाद वर्चस्व राखले. ब्राझीलमध्ये झालेल्या या वर्ल्डकपमध्येही भारतीय नेमबाजांनी आपला दबदबा राखला. मंगळवारी संपलेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ, अशी एकूण नऊ पदके पटकावली. या वर्ल्ड कपमध्ये इतर देशांच्या नेमबाजांना एक सुवर्णपदकाच्या वर कमाई करता आली नाही. भारताने या वर्षातील चारही वर्ल्डकपमध्ये मिळून २२ पदकांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी भारताने वर्ल्डकपमध्ये एकूण १९ पदके मिळवली होती.
