भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा नावाच्या एका दहशतवादी संघटनेनं त्यांच्या निशाण्यावर असलेल्या भारतातील काही नामवंत व्यक्तींची यादी बनवली असून ती राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) पाठवली आहे. यात विराटचं नाव असल्यानं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
‘ऑल इंडिया लष्कर हाय पावर कमिटी कोझीकोड, केरळ’ अशा नावानं ही यादी ‘एनआयए’कडं पाठवण्यात आली आहे. विराट बरोबरच या यादीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सत्यपाल मलिक यांच्याही नावाचा समावेश आहे.
देशातील महत्त्वाच्या व्यक्ती दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असणं ही काही नवीन नाही. मात्र, राजकारणाशी संबंधित नसलेला एखादा खेळाडू दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहशतवाद्यांच्या या नव्या संघटनेनं केवळ लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केलं असावं, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
