दादर स्थानकावर सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमधून उतरताना एका तरुणीला हृदयविकाराचा झटका आला. रेल्वे महिला पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेला वेळेत योग्य उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले. निकिता दिघे(२५) असे या महिलेचे नाव आहे.
दादर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सकाळी ९.४५च्या सुमारास सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून निकिता प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या. दादर स्थानकात उतरताच निकिता यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी स्ट्रेचरची वाट न पाहता सहा महिला रेल्वे पोलिसांनी त्यांना हातावर उचलून प्लॅटफॉर्म ६ वरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात दाखल करून तातडीने प्राथमिक उपचार केले. यामुळे महिलेचे प्राण वाचू शकले, अशी माहिती दादर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी स्थानकातील स्ट्रेचर आणि हमालाची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेत महिलेला वैद्यकीय कक्षात दाखल केल्यामुळेच संबंधित महिलेचे प्राण वाचू शकल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
