भारतीय क्रिकेट संघाला २०११ चा विश्वचषक व पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा युवराजनं आज मुंबईत केली. हा कटू निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते.
भारतीय क्रिकेट संघाला २०११ चा विश्वचषक व पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा युवराजनं आज मुंबईत केली. हा कटू निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते.
‘सिक्सर किंग’ अशी ओळख असलेला युवराज गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. पण त्याला संधी मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळं निवृत्तीचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्यातच सध्या सुरू असलेल्या विश्वचषकासाठी त्याचा विचारही झाला नाही. बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्यानं अखेर थांबण्याचा निर्णय घेतला.
निवृत्तीची घोषणा करण्यासाठी युवराजनं एक पत्रकार परिषद घेतली. तब्बल १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा युवराज निवृत्तीबद्दल बोलताना भावूक झाला होता. ‘भारतीय संघात परतण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण त्यात यश मिळालं नाही. त्यामुळं हीच थांबण्याची योग्य वेळ आहे, असं मला वाटलं. खेळाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यानं आभार मानले.
युवराज यापुढं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार नसला तरी क्रिकेटशी त्याचं नातं कायम राहणार आहे. आयसीसीची मान्यता असलेल्या परदेशातील टी-२० लीगमध्ये तो खेळणार आहे. युवराजला कॅनडातील जी टी-२० आणि आयर्लंड व हॉलंडमधील युरो टी-२० स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण मिळालं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्यानं दिली.
