धोकादायक स्थितीत असलेल्या अंधेरी येथील गोखले पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी रविवारपासून खुला करण्यात आला. वाहनांसह पादचाऱ्यांनाही या पुलाचा वापर करता येणार आहे. पावसाळ्याआधी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
अंधेरी येथील गोखले पुलावरील ३.३ मीटर रुंदीचा दोन्ही दिशेकडील कॅण्टीलिव्हर स्लॅब आणि पुलातील युटिलिटी वायर्स हटवण्यात आल्या. पुलाला मजबुती देण्यासाठी नवीन गर्डर उभारण्यात आला. स्टीलचे ब्रॅकेट्स, क्रॅश बॅरिअर आणि प्रवासी सुरक्षिततेसाठी स्टेनलेस स्टीलची जाळीदेखील बसवण्यात आली आहे. या सर्व कामासाठी ३.३४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
३ जुलै २०१८ रोजी अंधेरीजवळच्या गोखले पुलाचा पादचारी मार्गिकेचा संपूर्ण भाग रुळांवरून कोसळून मोठी दुघर्टना घडली होती. दुर्घटनेत दक्षिण दिशेचा पादचारी भाग कोसळल्यामुळे तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. दक्षिण बाजूच्या पादचारी मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम जुलै २०१८ मध्ये सुरू करण्यात आले होते, ते जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाले. या पुलाची दुरुस्ती सुरू असताना केवळ तीन चाकी रिक्षा व दुचाकींना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दुसरी उत्तर बाजू चार महिन्यांत दुरुस्त करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
